गणपतीची आरती

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची । सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ता फळाची ॥१॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ.॥ रत्नखचित बरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुकेशरा । हीरे जडीत मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥ जय.॥२॥ लंबोदर पितांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना । दास रामाचा वाट पाहे सदना ।संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना ॥ जय.॥३॥

 

शंकराची आरती

लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा ॥ विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ॥ लावण्य सुंदर मस्तकी भाळा ॥ तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥१॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा ॥ आरती ओवाळूं तुज कर्पुरगौरा ॥धृ.॥ कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा ॥ अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ॥ विभुतीचे उधळण शितकंठ नीळा ॥ऎसा शंकर शोभे उमा वेल्हाळा ॥ जय देव .॥२॥ दैवी दैत्य सागर मंथन पै केलें ॥ त्यामाजी अवचीत हळाहळ उठिले ॥ तें त्वा असुरपणे प्राशन केले ॥ नीळकंठ नाम प्रसिध्द झाले ॥ जय देव .॥३॥ व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ॥ पंचानन मदमोहन मुनीजन सुखकारी ॥ शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ॥ रघुकुळटिळक रामदासा अंतरी ॥ जय देव जय देव. ॥४॥

 

देवीची आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजवीन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी । वारी वारी जन्म मरणाते वारी ।हारी पडलो आतां संकट निवारी ॥धृ.॥ जय देवी जय देवी महिषासुरमथिनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥१॥ त्रिभुवनभुवनी पाहतां तुज ऎसी नाही । चारी श्रमले परंतु न बोलवे कांही ॥ साही विवाद करितां पडले प्रवाही ।ते तु भक्तालागी पावसी लवलाही ॥ जय.॥२॥ प्रसन्नवदनी प्रसन्न होसी निजदासा । क्लेशांपासूनी सोडी तोडी भवपाशा । अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा । नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा । जय देवी जय देवी महिषासुरमथिनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥३॥

 

आरती श्री गुरुदत्ताची

त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा । त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ॥ नेती नेती शब्द न ये अनुमाना । सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥१॥ जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता । आरती ओवाळितां हरली भवचिंता । सबाह्य अभ्यंतरी तूं एक दत्त । अभाग्यासी कैसी न कळे ही मात ॥ पराही परतली येथे कैसा हेत । जन्म मरणाचा पुरलासे अंत ॥ जय.॥२॥ दत्त येऊनिया उभा ठाकला । सदभावे साष्टांगे प्रणिपात केला । प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला ॥ जन्म-मरणांचा फेरा चुकविला ॥ जय.॥३॥ दत्त दत्त ऎसें लागलें ध्यान । हरपले मन झालें उन्मन ॥ मी तू पणाची झाली बोळवण ॥ एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान ॥जय देव. ॥४॥

 

आरती विठ्ठलाची

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ निढळावरी कर ठेवूनी वाट मी पाहे ॥धृ.॥ आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ॥ पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥येई.१॥ पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला ॥ गरुडा वर बैसून माझा कैवारी आला ॥येई.२॥ विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ॥ विष्णुदास नामा जीवेभावे ओवाळी ॥येई हो.॥३॥ असो नसो भाव आम्हां तुझिया ठाया ॥ कृपा दृष्टी पाहे माझा पंढरीराया ॥४॥ श्री ज्ञानदेवाची आरती आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा । सेवती साधुसंत मनु वेधला माझा ॥ आरती .॥ लोपले ज्ञान जगी । हित नेणती कोणी । अवतार पांडुरंग ॥ नाम ठेविले ज्ञानी ॥ आ.॥१॥ कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी ॥ नारद तुंबरहो ॥ साम गायन करी ॥ आ.॥२॥ प्रकट गुह्य बोले । विश्व ब्रम्हचि ठेले ॥ रामा जनार्दनी । पायीं मस्तक ठेविलें ॥ आरती ज्ञानराजा महा ॥ आ.॥३॥